मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारने इंग्रजांनाही लाजवेल अशी दडपशाही सुरू केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांबद्दल कमालीचा द्वेष असून त्यातूनच हे सारे घडत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची घोषणाही जरांगे यांनी केली.
आंतरवालीत सुरू असलेले उपोषण थांबवल्यानंतर मनोज जरांगे हे शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आंतरवालीतील उपोषण मंडप, व्यासपीठ काढून टाकण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. मात्र तो फक्त मंडप नसून मराठ्यांच्या अस्मितेचे ठिकाण आहे. ते काढण्याचे चाळे करू नका, असा इशारा जरांगे यांनी दिला. राज्य सरकारने कितीही चौकश्या केल्या, तुरुंगात टाकले तरी आरक्षणाच्या मागणीवरून तसूभरही हटणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
उपचारानंतर राज्यभर दौरा
उपचार घेतल्यानंतर राज्यभर दौरा करणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यासाठी वकिलांनी मोफत न्यायालयीन लढाई लढावी, असे आवाहनही त्यांनी केले. उच्च न्यायालयाने आम्हाला शांततेत आंदोलन करण्याची परवानगी दिलेली असतानाही राज्य सरकार द्वेषभावनेने आंदोलकांवर गुन्हे दाखल करत असून, हा अन्याय असल्याचे जरांगे म्हणाले. राज्य सरकारच्या या दडपशाहीविरोधात राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे ई-मेल करून आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.