मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जनसमुदाय घेऊन मनोज जरांगे-पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज सायंकाळी मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. मात्र जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लाखोंचा जत्था मुंबईबाहेरच रोखण्याची तयारी सुरू असून आधी सरकारकडून मनधरणीचा प्रयत्न झाला, तर आता मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानाची क्षमती कमी असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलनासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29मध्ये असणाऱ्या इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कचा पर्याय सूचवला आहे.
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे-पाटील यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले की, ज्याअर्थी, आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.
त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.
ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावर पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान 3024/प्र.क्र. 12/2024/कीयुसे-1, दि. 24.01.2024 अन्वये तेथे आंदोलनासाठी परवान देण्यात आलेली नाही.
शिवाजी पार्कवरही परवानगी नाही
दरम्यान, मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्कवरही आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. शिवाजी पार्क येथे एखादे आंदोलन किंवा कार्यक्रम याकरिता उच्च न्यायालयाने दिलेल्या 4 जानेवारी 2013 च्या आदेशातील तरतूदीस अनुसरून शासन निर्णयाप्रमाणे बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सदर ठिकाणी विना परवानगी आंदोलन किंवा कार्यक्रम केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान होईल. तसेच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शिवाजी मार्कवर ध्वजारोहन व संचलनाचा शासकीय कार्यक्रम पूर्व निजोति असून आपल्या आंदोलनामुळे सदर कार्यक्रमास अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता शिवाजी पार्क मैदानाची नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.