महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना पालम तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगाव येथे येण्यापासून मराठा आंदोलकांनी रोखले. त्यांनी जानकर यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी दिल्या.
जानकर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भोगाव येथील मारुती मंदिराच्या दर्शनासाठी येत होते. त्यांचा वाहनांचा ताफा भोगाव फाट्यावरच मराठा आंदोलकांनी रोखला. लागलीच आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जाणकारांचा तीव्र निषेध केला. शिवाय एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. दरम्यान महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कोणत्याही परिस्थितीत आपण जानकर यांना भोगावात येऊ देणार नाही अशी, भूमिका आंदोलकांनी घेतली. या फाट्यापासूनच माघारी फिरा, असे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. परंतु महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना दर्शनासाठी जानकर येत असल्याचे सांगितले. शिवाय जानकर मंदिरात दर्शन घेऊन वापस निघणार आहेत. ते गावात प्रचारासाठी देखील जाणार नाहीत, असे माहितीचे पदाधिकारी आंदोलकांना विनंतीवजा सांगत होते. तरी आंदोलन आपल्या भूमिकेपासून परावृत्त झाले नाहीत. जवळपास 15 मिनिटे जानकर वाहनात थांबून होते. त्यांना आंदोलक ऐकतील असे वाटले. मात्र जानकरांचा नाईलाज झाला, अखेरीस जानकर यांना दर्शनाविना माघारी परतावी लागले. शिवाय जानकर यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःवरून माघारी परतण्याचा सल्ला दिला. श्री जानकर यांच्या बाबतीत दुसऱ्यांदा अशी घटना प्रचारादरम्यान घडली आहे.