सरकार स्थापन झाल्यावर उपोषणाची तारीख जाहीर करणार; मनोज जरांगे यांची मोठी घोषणा

राज्यात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात जरांगे फॅक्टर संपल्याची चर्चा आहे. मात्र, आपण मैदानातच नव्हतो. मराठ्यांचा नाद करू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. आता जरांगे यांनी मराठा आंदोलन आणि उपोषणाबाबत नवी घोषणा केली आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यावर सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.

मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. माझा समाज आज माझ्या पाठीमागे आहे. आता कोणीही आलं तरी समाजासाठी लढावं लागणार आहे. कोणीही येऊ द्या तीच सासू आहे. आम्ही वठणीवर आणू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे लागेल. मराठ्यांच्या नादी लागू नका, असेही ते म्हणाले.

कोणी म्हणत असेल जरंगी फॅक्टर फेल गेला पण मी त्यांना सांगतो की मी मैदानातच नव्हतो. जेव्हा मी मैदानात होतो तेव्हा पाणी पाजलेले आहे. मी जर बाहेर पडलो असतो तर 80 ते 90 जणांना बूक्का लावला असता असेही जरांगे पाटील म्हणाले. काही उमेदवार फक्त 2 हजार 5 हजार दहा हजार अशा मताने निवडून आलेले आहेत.. मी जर एक राऊंड मारला असता तर सगळे उलथे पालथे केले असते, असेही ते म्हणाले.

सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषण सुरू करू. हे सामूहिक आमरण उपोषण असं असणार आहे की पूर्ण देशात सुद्धा झालेलं नसेल. एकाच दिवशी एकाच वेळी अंतरवाली सराटी मध्ये सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. पुन्हा एकदा संपूर्ण मराठ्यांनी एकजूट होऊन सामुहिक आमरण उपोषणाला आंतरवाली सराटीतल्या तयारीला लागा. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख मी जाहीर करणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.