विधिमंडळात आज अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना वारंवार शांत राहण्याची विनंती केली केली; पण अध्यक्षांच्या मोकळय़ा जागेत उतरून घोषणाबाजी आणि अध्यक्षांच्या समोरील टेबल वाजवत घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सकाळच्या सत्रात चार वेळा कामकाज तहकूब करावे लागले. सत्ताधाऱयांच्या गोंधळातच पुरवणी मागण्या आणि चार विधेयके मंजूर करण्यात आली. अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. विधान परिषदेचे कामकाज तर पहिल्या दहा मिनिटांत तहकूब झाले.
सत्ताधाऱयांचा गोंधळ–विरोधकांचा संयम
विधानसभेचे नियमित कामकाज 11 वाजता सुरू झाले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर पुढील कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजपचे अमित साटम उभे राहिले आणि त्यांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे सदस्य उपस्थित न राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली सत्ताधारी पक्षाचे सदस्य विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत आले आणि घोषणा देण्यास सुरुवात केली. सत्ताधाऱयांचा गोंधळ सुरू असला तरी विरोधी बाकावरचे सदस्य शांत होते.
चर्चा न करता सरकार पळ काढतंय!
स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी व उपसभापती यांनी संगमताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्दय़ावर चर्चा न करता कामकाज चालवायचे नाही, ही सत्ताधाऱयांची भूमिका चुकीची आहे. सभागृह तहकूब केल्यामुळे विरोधी पक्षांनी आज विधिमंडळाच्या पायऱयांवर घोषणा देत निषेध नोंदवला. सरकारने दोन्ही घटकांशी चर्चा करायला हवी होती. मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही माहिती विरोधी पक्षाला सरकारने दिली नाही. अडचणीचा विषय येताच सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. एक प्रकारे सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पळ काढतेय. नवी मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा आला होता त्या वेळी मुख्यमंत्री एकटेच मोर्चाला का सामोरे गेले, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला
अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट
महायुतीचे पितळ उघडे पडेल म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट सुरू आहे. महायुतीचे 200च्या वर अधिक आमदार असूनही आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. महायुतीचे पितळ उघडे पडेल म्हणून विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
सत्ताधारी सदस्यांना उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उभे राहिले, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची घोषणाबाजी सुरूच होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना शांत राहण्याची आणि विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करीत होते; पण सत्ताधाऱयांच्या गोंधळातच विजय वडेट्टीवार यांनी भाषणाला सुरुवात केली. सत्ताधाऱयांच्या गोंधळातच विरोधी पक्षनेत्यांचे भाषण सुरू होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वांरवार सत्ताधाऱयांना शांत राहण्याची विनंती करीत होते. सत्ताधारी ऐकत नसल्याने अध्यक्षांनी प्रथम पाच मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
पाच मिनिटांनंतर कामकाज पुन्हा सुरू होताच सत्ताधारी पक्षाचे सदस्य पुन्हा अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत जमले आणि महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देऊ लागले. काही सदस्यांनी अध्यक्षासमोरील टेबलावर हात मारून वाजवण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत होता. त्यानंतर दहा मिनिटांसाठी, मग 45 मिनिटांसाठी, त्यानंतर वीस मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू होताच वित्तमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या आणि चार विधेयके मंजुरीसाठी मांडली. या सर्व गोंधळात पुरवणी मागण्या आणि विधेयके मंजूर होताच तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
दरम्यान, विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. राज्यात जातीय सलोखा बिघडून गावागावांत जातीय तेढ मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांसह महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि या ठिकाणी मार्ग काढावा, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती. सर्वपक्षीय पक्षप्रमुखांना पत्रव्यवहार केला, मात्र विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधकांचे पुतना मावशीचे प्रेम यातून समोर आल्याची टीका दरेकर यांनी केली. त्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दरेकर यांना प्रत्युत्तर दिले. बैठकीपूर्वी मराठा-ओबीसी नेत्यांशी सरकारने परस्पर केलेल्या चर्चेची माहिती सभागृहाला देण्याची विनंती केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. सत्ताधारी-विरोधकांनी वेलमध्ये आमने-सामने येत घोषणाबाजी करत गोंधळ केल्याने उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
परिषदेत 10 मिनिटांत कामकाज गुंडाळले
उपसभापतींनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांत गुंडाळले. लोकआयुक्त आणि उपलोकआयुक्तांनी राज्यपालांना दिलेला अहवाल, कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा 2022-23 सालचा 60 वा वार्षिक अहवाल, सिडको महानगर-3 प्रकल्पाबाबतची कागदपत्रे, 93 अन्वयेची सूचना, पूरक व पुरवणी मागण्या पटलावर सादर करून परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.