‘जे लोक हिंदू खतरे में म्हणतात, त्यांना मराठय़ांची आरक्षण लढय़ातील एकजूट दिसत नाही का?’ मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले तेच विधानसभेत करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारले. हिंदू धोक्यात असेल तर या लोकांनी मराठय़ांची स्थिती ठीक करणे गरजेचे आहे. आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठय़ांना हिंदूविरोधी असल्याचे ठरवता, तर मुस्लिमांवर निशाणा साधतात, तेव्हा आमची गरज पडत असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले. मराठा समाजाला माहीत आहे कोणाला पाडायचे आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम नाही, असेही ते म्हणाले. जे आरक्षण विरोधी आहेत त्यांना ते शंभर टक्के पाडतील. मोदींच्या विकासाच्या दाव्यावर जरांगे-पाटील यांनी टीका केली. मुस्लिम, दलित मतदारांच्या मनात सत्ताधाऱयांविषयी राग आहे, तो मतदानातून व्यक्त होईल, असे ते म्हणाले.
समाजाचा निवडणुकीत काय निर्णय असणार? त्यावर बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे. मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे. लोक आम्हाला वेडय़ात काढतात. मराठे एकमेकांचं ऐकत नाहीत. एकत्र येत नाहीत. मराठय़ांना गोड बोललो की, मराठे फसतात. परंतु मराठय़ांनी दाखवून दिले की, कुणाचेही नाव न घेता मराठा समाज त्यांना धुळीस मिळवू शकतो, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अजित पवार यांना सुनावले.
n दहा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला मागितले नव्हते, हे दहा टक्के आरक्षण टिकणारही नाही. जेव्हा 13 टक्के आरक्षण रद्द झाले होते त्यावेळी मराठय़ांच्या मुलांचे नुकसान झाले होते, आम्हाला हक्काचे आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच आहोत, असे मराठा आंदोलक जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
आम्ही शिवछत्रपतींचे हिंदुत्व मानतो!
मुस्लिम विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठय़ा देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही दोन्ही घोषवाक्ये कोणासाठी आहेत. मराठा ही हिंदूमधील मोठी जात आहे. तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ. आम्ही शिवछत्रपतींचे हिंदुत्व मानतो, आम्ही आमचे संरक्षण करू शकतो. तुम्ही तुमचे काम करा, असेही जरांगे-पाटील म्हणाले.