मराठा आरक्षणाचा मुद्दा बेदखल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमधील जाहीर सभेत जातीवर घसरले. माझ्या रूपाने ओबीसींच्या लहान जातीचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला, म्हणून काँग्रेस ओबीसींचा तिरस्कार करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘हम एक है, तो सेफ है’ असा ओबीसींना उद्देशून नारा त्यांनी दिला. या विधानामुळे खळबळ उडाली असून, देशाच्या पंतप्रधानांनी समाजा-समाजांमध्ये असा दुजाभाव केल्याने संताप व्यक्त होत आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी नाशिक येथे जाहीर सभा झाली, त्याप्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या योजनांचा त्यांनी पाढा वाचला, काँग्रेस आघाडीला लक्ष्य केले. माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसींचे ऐक्य तोडण्याचे काम केले. 1990ला ओबीसींमध्ये जागृती आली, त्यांची एकजूट झाली, तेव्हापासून काँग्रेसचे स्वबळावर सरकार येणे बंद झाले. यामुळे काँग्रेस ओबीसीत फूट पाडण्याचे षङ्यंत्र करीत आहे. वाणी-गुजर, कुंभार-न्हावी, माळी-कुणबी, नामदेव-अहिर, धनगर, तांबोळी असा वाद ओबीसींमध्ये निर्माण करून त्यांचे ऐक्य संपविण्याचे काम काँग्रेस करीत आहे. यामुळे ओबीसीत विभागणी झाली. एकजूट तुटली तर आपली ताकद कमी होईल, काँग्रेसला सत्तेचा मार्ग मोकळा होईल. ऐक्य कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. ‘हम एक है तो सेफ है, सच्चाई यही है। काँग्रेस ओबीसी से नफरत करती है’ असा नारा देत आपण फक्त ओबीसी समाजाला बळ देत असल्याचा संदेश दिला.
म्हणून काँग्रेसचा ओबीसींवर राग!
एकशेचाळीस कोटी देशवासीयांच्या आशीर्वादाने ओबीसी समाजाचा एक व्यक्ती सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला, हे काँग्रेसला सहन होत नाही, त्यांच्या पचनी पडत नाही. तब्बल 60 वर्षांनंतर ओबीसींच्या छोटय़ा जातीचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला, यामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. माझ्यासारखा ओबीसी पंतप्रधान झाल्यानेच काँग्रेस ओबीसींचा तिरस्कार करीत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.