Satara news – मान्याचीवाडी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

दिल्ली येथे झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने, सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशनी नागराजन.

ग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कारा’ने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा बुधवारी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या पुरस्कारासह ‘ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारा’नेही मान्याचीवाडीला गौरविण्यात आले.

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व सरपंच रवींद्र माने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी गटविकास अधिकारी सरिता पवार, मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र माने यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या पुरस्कारांमध्ये तब्बल अडीच कोटी रुपये रकमेचा समावेश आहे.

गरिबीमुक्त, आरोग्यदायी, बालस्नेही, जलसमृद्ध, स्वच्छ हरित, पायाभूत सुविधांनीयुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव व महिलास्नेही गाव या शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित बाबींवर विशेष काम करत शाश्वत विकासाचे गाव निर्माण करण्यासाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले.

पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील ग्रामपंचायतींची या पुरस्कारांसाठी तपासणी झाली होती. त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कारासाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने या पुरस्कारांसाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला एक कोटी पन्नास लाखांच्या सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार घोषित करण्यात आला होता. त्याचबरोबर राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेल्या आणि अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे प्रभावी काम केल्याबद्दल एक कोटी रुपयांचा प्रथम क्रमांकाचा ‘ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार’ ही जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळाल्याने मान्याचीवाडी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या पुरस्कारामुळे जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

गेल्या चोवीस वर्षांपासून गावातील सर्वच घटकांनी गावामध्ये लोकसहभागाची चळवळ उभी केली आहे. यामध्ये अनेक चढउतार पाहिले. कधी अपयश आले तरी कधी खचून गेलो नाही. मात्र, लोकांच्या सहकार्यान ग्रामविकासाची मशाल कायम तेवत ठेवली. आज चारशे लोकसंख्येच्या छोट्याशा गावाने देशपातळीवरील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा बहुमान पटकावला हे सर्व श्रेय ग्रामस्थांच्या एकीचे आहे.

रवींद्र माने, सरपंच मान्याचीवाडी

‘पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा – यारानी नागराजन

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला, हा क्षण मान्याचीवाडी व माझ्यासाठी खूप मोठा आहे. या पुरस्काराने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांसह सरपंच व पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मान्याचीवाडीचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घेण्याची गरज आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले.