
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील काही गावांतील लहान मुले आणि तरुण महिलांची संख्या दिवसागणिक कमी होत चाललेय. हर्सिल, मुखबा, बगोरी, धाराली, सुखी, पुराली, झाला आणि जसपौर या आठ वस्त्यांमधील मुले, सुना गाव सोडून शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे गावात फक्त पुरुष मंडळी उरली आहेत. गावे रिकामी झाली आहेत. महिला-मुलांचे हे स्थलांतर जबरदस्तीने केलेले नाही किंवा आर्थिक संकटातून झालेले नाही. हे स्थलांतर झालंय ते मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून.
उत्तरकाशी जिह्यातील आठ गावांतील महिला आपल्या मुलांना घेऊन चांगल्या शिक्षणासाठी डेहराडून आणि उत्तरकाशी या शहरी भागात राहत आहेत. त्यांचे नवरे गावात राहून सफरचंदाची बाग सांभाळत आहेत आणि पर्यटन व्यवसाय चालवत आहेत. हर्सिलजवळच्या सीमावर्ती गावात राहणारी अनुप्रिया रावत सांगते, मी सध्या मुलासोबत डेहराडून येथे राहते. नवऱयाशिवाय इथे एकटीने राहणे आवडत नाही. पण मुलाच्या चांगल्या भविष्यातील आम्हाला हा त्याग करावा लागत आहे. माझ्यासारख्या अनेक महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडले आहे. अनुप्रिया पुढे सांगते, आमच्या इथे आठ गावांमध्ये एक इंटरस्कूल आहे. बागोरी गावात तर एकही प्राथमिक शाळा नाही. जिथे शाळा आहे, तिथे अवघ्या दोन शिक्षिका सगळे विषय शिकवतात. त्यामुळे शिक्षणाचा मूलभूत दर्जादेखील राखला जात नाही. गावच्या शाळांमध्ये अस्वच्छता, शिक्षकांची अनुपस्थिती अशा अनेक समस्या आहेत, असे धारली गाव सोडून गेलेल्या आशा पनवार हिने सांगितले. ती उत्तरकाशी येथे मुलांच्या शिक्षणासाठी राहते. तिचा नवरा गावाला राहतो. सर्व गावे रिकामी झाले आहेत. गावांमध्ये तरुण सुना किंवा शाळेत जाणारी मुले दिसणार नाहीत असे आशा पनवारने सांगितले.
– गावात राहणारे पुरुष सफरचंदाच्या बागा आणि पर्यटन व्यवसाय सांभाळतात. कधी एकटय़ाने तर कधी मोठय़ा नातेवाईकांच्या मदतीने शेती, व्यवसाय करतात. त्यांची आर्थिक सुबत्ता दिसून येते.
– इथल्या शाळांची परिस्थिती जेवढी सांगितली जाते तेवढी वाईट नाही, पण गावकऱयांना शहरातील शिक्षण आर्थिकदृष्टय़ा परवडते, त्यामुळे ते शहरात स्थलांतरित होत आहेत.