मंत्रिमंडळ विस्तारात सर्व समाजघटकांना स्थान दिल्याचा दावा महायुतीकडून केला जात असला तरी या विस्तारात अनेकांना डावलले गेल्याने नाराजीचा विस्तव पेटला आहे. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार या ज्येष्ठ नेत्यांसह महायुतीमधील अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ तर ‘जहा नहीं चैना… वहा नहीं रहना’ अशी टोकाची भूमिका घेत नाशिकला निघून गेले. दरम्यान, सत्ताधारी 12 नाराज आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकला.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी अर्धवट सोडून थेट नाशिक गाठले. तत्पूर्वी मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सात-आठ दिवसांपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला म्हटले होते की तुम्हाला राज्यसभेचे खासदार व्हायचे असेल तर करतो. पण मागितले तेव्हा खासदारपद दिले नाही, असे आपण म्हणालो. आता येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिल्याने राज्यसभेवर गेलो तर त्यांच्याशी प्रतारणा होईल, असे भुजबळ म्हणाले. अजित पवार यांच्याशी यासंदर्भात बोलणार आहात का, असे माध्यमांनी विचारताच, अजित पवारांशी बोलण्याची गरज नाही, असे म्हणत भुजबळांनी आपली नाराजी किती तीव्र आहे हे दाखवून दिले. मी सामान्य कार्यकर्ता, मला डावलले किंवा बाजूला फेकले तरी फरक पडत नाही, असे म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मनोज जरांगेंना अंगावर घेतले, त्याचे बक्षीस मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाशिकमधील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्रिपद दिले जाते, मला नाही – मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिवेशनाला अनुपस्थित राहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नितीन गडकरी हे माझे मार्गदर्शक आहेत, म्हणून आज त्यांची भेट घेतली. मला मंत्रिमंडळात नाव आहे असे सांगण्यात आले होते, पण मी आज मंत्री नाही. तरीही, मी नाराज असण्याचे कारण नाही. कारण, काल जे आपल्यापाशी होते ते उद्या जाणार आहे आणि उद्या जे आपल्यापाशी नसेल ते परवा येणार आहे, याची मला जाणीव आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मात्र, किशोर जोगरेवार, गणेश नाईक यांचे उदाहरण देत, ज्यांचा मुलगा दुसऱया पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्रिपद दिले जाते, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी खदखद व्यक्त केली.
तानाजी सावंत बॅग उचलून पुण्याला
सावंत तब्येतीचे कारण सांगून नागपूरहून काल रात्रीच थेट पुण्याला गेले. आज ते अधिवेशनालाही आले नाहीत. त्यांनी माध्यमांशी बोलण्याचेही टाळले आहे. त्यांच्या कार्यालयाकडून माध्यमांसाठी तसे पत्रकही जारी करण्यात आले. रात्री उशिरा त्यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल पह्टोही बदलला आणि शिवसेना हे नावही काढून टाकले. नव्या प्रोफाईलमध्ये त्यांनी फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून तिथे शिवसैनिक असे लिहिले आहे. धाराशिवमधील परांडा मतदारसंघात सावंत यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची मागणी केली.
अजित पवार यांचा निषेध करीत भुजबळ समर्थकांनी सोमवारी येवला मतदारसंघातील विंचूर येथे रास्ता रोको केला. नाशिक आणि येवल्यातही निदर्शने करण्यात आली.
भुजबळांनी घातले काळे कपडे
छगन भुजबळ कामकाजात काळय़ा रंगाचा जोधपुरी घालून सहभागी झाले होते. काळे कपडे घालून महायुती सरकारचा निषेध नोंदवल्याची चर्चा मात्र विधान भवनात रंगली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार तसेच शिंदे गटाचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम सभागृहात आले नाहीत. मात्र दीपक केसरकर थोडय़ा वेळाने सभागृहात पोहोचले आणि दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत थांबले.
भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही याचा अर्थ अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल असे अजित पवार गटाचे प्रवत्ते अमोल मिटकरी म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, मुनगंटीवार यांच्यावर पक्षाने विशेष जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही, अशी सारवासारव केली. त्याबाबत मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे ते म्हणाले. पण मुनगंटीवार यांनी त्याला दुजोरा दिला नाही.
अडीच वर्षांनंतर मंत्रिपद दिले तरी घेणार नाही – शिवतारे
शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटाला जाऊन मिळालेले विजय शिवतारे यांचीही मंत्रिपदाची लालसा फडणवीस यांनी पूर्ण होऊ दिली नाही. मंत्रिपद न मिळाल्याचे दुःख नाही, आम्हाला मिळालेल्या वागणुकीचे वाईट वाटते. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवतारे यांनी दिली. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी शंभर टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्र्यांकडून करून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते, असे शिवतारे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हे! आता मंत्रिपद दिलं तरी घेणार नाही!
आम्हाला मिळालेल्या वागणुकीचे वाईट वाटते. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत, असे विजय शिवतारे म्हणाले. होय, मी नाराज आहे. मग… पुढे काय? होय, मी नाराज आहे. मग पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो, मी नाराज आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तुमचे वरिष्ठांशी बोलणे झाले का असे विचारले असता, ‘कोण वरिष्ठ? मला त्याची आवश्यकता वाटत नाही’, असे ते म्हणाले.
फडणवीसांशी प्रदीर्घ चर्चा? अजिबात नाही!
फडणवीसांनी सुधीरभाऊंशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे म्हटले होते. त्याला मुनगंटीवारांनी उत्तर दिले. प्रदीर्घ चर्चा नाही. आज नुसते बोलणे झाले, असे त्यांनी सांगितले.
आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलांसकट गडी घेऊन गेले!
आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिले. मात्र, आमचे शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलांसकट गडी घेऊन गेले, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे भाजपच्या संघटनात्मक पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.