एलफिन्स्टन (आताचे प्रभादेवी) आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी होऊन तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 29 सप्टेंबर 2017 रोजी घडली होती. या घटनेत 32 हून अधिक जखमी झाले होते. या घटनेतूनही रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कुठलाही धडा घेतलेला दिसत नाही. मुंबईत अनेक रेल्वे स्थानके अशी आहेत ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, परळ, दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, कर्जत अशा अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते; परंतु चिंचोळे आणि जीर्ण झालेले जिने, योग्य नियोजनाचा अभाव यामुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे.
रेल्वे स्थानकांशिवाय अनेक ठिकाणी मैदानांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्येही क्षमतेपेक्षा अधिक लोकांना परवानगी दिल्याने चेंगराचेंगरीच्या घटना घडलेल्या आहेत. पाच वर्षांत देशात 200 मोठे रेल्वे अपघात झाल्याचा अहवाल रेल्वेने प्रसिद्ध केला होता. हिंदुस्थानी रेल्वेने 17 रेल्वे झोनमधील डेटा प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार 200 रेल्वे अपघातांमध्ये 351 लोक मरण पावले.
रेल्वेमंत्र्यांच्या केवळ बुलेट ट्रेनच्याच गप्पा
रेल्वेमंत्री केवळ बुलेट ट्रेनच्याच गप्पा मारत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. 2026 मध्ये मुंबई-अहमदाबाद मुंबई ही पहिली बुलेट ट्रेन देशात सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्च 2024 मध्ये केली होती. त्यानुसार बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. परंतु, रेल्वेचे जे जाळे सध्या उपलब्ध आहे त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होताना दिसत नाही. बालासोरसारखे मोठे अपघात अजूनही घडत आहेत. एक्स्प्रेस रेल्वे मालगाड्यांना धडकत आहेत. प्रवाशांचे नाहक जीव जात आहेत. असे असताना रेल्वेमंत्र्यांकडून यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलली जात नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
2003 पासून देशभरात चेंगराचेंगरीच्या अनेक घटना
15 ऑक्टोबर 2016
काशी विश्वनाथाची नगरी वाराणसीच्या राजघाट पुलावर चेंगरेंचगरी झाली होती. यात 25 जणांचा मृत्यू, तर 60 हून अधिक जखमी झाले होते.
3 ऑक्टोबर 2014
पाटण्याच्या गांधी मैदानात दसऱ्याच्या दिवशी रावणदहनादरम्यान चेंगचेंगरी होऊन 33 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जखमी झाले होते. अपघातावेळी गांधी मैदानात तब्बल 5 लाख लोक उपस्थित होते.
10 फेब्रुवारी 2014
संगमनगरी अलाहाबादच्या कुंभमेळ्यात रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 39 जण जखमी झाले होते.
13 ऑक्टोबर 2013
मध्य प्रदेशच्या दतियामध्ये रत्नगड मंदिराजवळ उडालेल्या गदारोळात तब्बल 89 जण मृत्युमुखी पडले होते.
12 नोव्हेंबर 2012
बिहारच्या राजधानी पाटणामध्ये छठपूजेदरम्यान उडालेल्या गोंधळात 17 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 9 मुले आणि 3 महिलांचा समावेश होता.
14 जानेवारी 2011
केरळच्या सबरीमाला मंदिरात उडालेल्या गोंधळामुळे 106 भाविकांचा मृत्यू झाला होता.
4 मार्च 2010
उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये मनगड धाममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 63 जणांचा मृत्यू झाला होता.
3 ऑगस्ट 2006
हिमाचल प्रदेशातील नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 160 भाविकांना जीव गमवावा लागला होता.
फेब्रुवारी 2005
शाकंभरी पौर्णिनेमिमित्त देवीदर्शनासाठी लाखोंची गर्दी जमली होती. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 250 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.
27 ऑगस्ट 2003
नाशिकच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमुळे 40 जणांचा मृत्यू झाला होता.