डोंबिवलीत ‘टॅलेंट हंट’ मोहिमेत 1400 खेळाडूंचा सहभाग

डोंबिवली जिमखाना येथे मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या वार्षिक ‘टॅलेंट हंट’ मोहिमेत ठाणे ते आसनगाव या भागातून क्रिकेट खेळणाऱ्या तब्बल 1400 मुला-मुलीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी या गुणवान खेळाडूंचे कसून चाचणी घेण्यात आली.

ग्रामीण भागातील गुणवत्तेला शोधून काढण्यासाठी डोंबिवली जिमखाना येथे एमसीएने आयोजित केलेल्या गुणवत्ता शोधमोहिमेला लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून एमसीएचे सचिव अभय हडप, सहसचिव दीपक पाटील हेसुद्धा भारावले. या  टॅलेंट हंटचे  नेतृत्व टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांनी केले. तसेच एमसीए प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंनीही या निवड चाचणी  प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. या टॅलेंट हंटमध्ये 14 वर्षांखालील गटात 638, 16 वर्षांखालील गटात  745 आणि 19वर्षांखालील गटात  648 मुलांचा सहभाग होता. प्राथमिक निवड प्रक्रिया 10 ते 12 जानेवारीदरम्यान पार पडली होती. नुकत्याच पार पडलेल्या या शोधमोहिमेतून 75 खेळाडूंचे कसून परीक्षण आणि ट्रायल्स घेण्यात आले.

डोंबिवली जिमखान्याचा बहुमान

एमसीएच्या अधिकाऱयांनी डोंबिवली जिमखान्याच्या उत्कृष्ट दर्जाच्या खेळपट्टय़ा आणि सोयीसुविधांची पाहणी करूनच या कार्यक्रमासाठी जिमखान्याची निवड केली होती. या संपूर्ण प्रक्रियेसाठी डोंबिवली जिमखान्याने एमसीएला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या.  जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर, मानद सचिव पर्णाद मोकाशी, कोषाध्यक्ष आनंद डिचोलकर आणि डोंबिवली जिमखान्याचे क्रिकेट कोच राजेंद्र धोत्रे यांनी समीर दिघे, संतोष शिंदे, रवी घडियाल आणि नंदकुमार व दर्शन यांचा सत्कार केला.