मंत्रालयातल्या प्रवेशाची ऐशीतैशी, प्रवेशासाठी मंत्र्यांच्याच शिफारशींचा पाऊस; दिवसभरात पाच हजार व्हिजिटर्स

मंत्रालयातील व्हिजिटर्सची गर्दी कमी करण्यासाठी फेस रीडिंगची यंत्रणा आणला; पण मंत्रिमंडळ बैठकीच्या आजच्या दिवशी मंत्रालयातल्या प्रवेशाची ऐशीतैशी उडाली. मंत्रालयातील प्रवेशासाठी मंत्र्याच्या शिफारशींच्या पत्रांचा पोलिस यंत्रणेवर अक्षरशः पाऊस पडला आणि राजकीय कार्यकर्त्यांची मंत्रालयाच्या इमारतीमध्ये एकच झुंबड उडाली. आज दिवसभरात साडेचार ते पाच हजार व्हिजिटर्सची जत्रा झाली होती.

मंत्रालयात प्रवेशासाठी फेस डिटेक्शनवर आधारित फेशिअल रेकग्नेशन सिस्टम तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे मंत्रालयातील गर्दी कमी होऊन शासकीय कामाला गती येईल अशी प्रशासनाची अटकळ होती; पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात राजकीय कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आणि प्रवेश यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला.

मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा

मंत्रालयात सर्वसामान्यांना दुपारी तीननंतर प्रवेश दिला जातो. मंत्री कार्यालयातील शिफारस पत्र असले तर सहजपणे प्रवेश मिळतो. आज दुपारी एकच्या नंतर कार्यकर्त्यांची रीघ लागली. मंत्री कार्यालयातून मंत्रालयाच्या पोलिसांकडे शिफारस पत्रांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मंत्र्यांच्या शिफारस पत्रामुळे दुपारी एक ते दोनच्या सुमारास सातशे ते आठशे राजकीय कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

या कार्यकर्त्यांनी पहिल्या मजल्यापासून अगदी सहाव्या आणि सातव्या मजल्यापर्यंत सर्वत्र संचार सुरू केला. प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचारीही त्रस्त झाले होते. दिवसभरात साडेचार ते पाच हजारांवरून अधिक व्हिजिटर्स मंत्रालयात आले होते. या इमारतीमध्ये साडेदहा हजार सरकारी कर्मचारी काम करतात. अचानक व्हिजिटर्सची संख्या काही हजारांमध्ये वाढल्यामुळे लिप्टपासून स्वच्छतागृह आणि पँटिनच्या यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. मंत्री भरत गोगावले हे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीमधून खाली उतरले तेव्हा त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यांच्यासोबत पह्टो, सेल्फी काढण्यासाठी रेटारेटी सुरू झाली. त्यामुळे या इमारतीमधून बाहेर पडणाऱया महिला कर्मचाऱयांची प्रचंड कुचंबणा झाली.