अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळय़ाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आज रामलल्लाच्या दर्शनासाठी अक्षरशः जनसागर उसळला. महाकुंभमधूनही हजारोंच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले. हनुमान गढी येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी एक किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या. सकाळी रथयात्रा काढण्यात आली. त्यानंतर 41 दिवसांसाठी श्रीरामरक्षा स्तोत्र जप कार्यक्रमास सुरुवात झाली. यात सवा लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत.
– हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे राम मंदिर प्रतिष्ठापनेला 11 जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अंगद टीला स्थळावर 21 जानेवारीपर्यंत ‘राम कथा’चे आयोजन करण्यात आले होते. असे असले तरी इंग्रजी दिनदर्शिकेनुसार आज रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळय़ाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे ब्राह्ममुहूर्तापासूनच रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
– राम मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण करण्याची वेळमर्यादा निश्चित करण्यात आल्याचे मंदिर ट्रस्टने म्हटले आहे. त्यासाठी दर 15 दिवसांनी राम मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यात येत आहे. प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महाप्रसाद वितरणाचेही आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभ सुरू असेपर्यंत महाप्रसाद वितरण सुरू राहणार आहे.