माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर चीन, रशिया आणि अमेरिकेसह अनेक देशांनी व्यक्त केला शोक

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रशिया, चीन, फ्रान्स आणि अमेरिकेसह अनेक देशांच्या प्रमुखांनी आणि राजदूतांनी शोक व्यक्त केला आहे. हिंदुस्थानच्या प्रगतीत मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान असल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. यातच हिंदुस्थानातील फ्रेंच दूतावासाने ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं आहे की, ”डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामुळे जागतिक पटलावर हिंदुस्थानचे स्थान मजबूत झाले आणि फ्रान्ससोबतचे संबंध उत्तम झाले”.

मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. सिंग यांच्या निधनाबद्दल अनेक देशांच्या राजदूतांनी शोक व्यक्त केला. हिंदुस्थानातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं आहे, “हिंदुस्थान आणि रशियासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण आहे. आमच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये डॉ.मनमोहन सिंग यांचे योगदान अतुलनीय आहे.”

चीनचे राजदूत झू फेइहोंग यांनी एका पोस्टमध्ये शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, ”हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अतिशय दु:ख झालं. ते एक उत्कृष्ट नेते होते.” तर अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले की, ”आमचे प्रिय मित्र आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे हिंदुस्थान आणि जगासाठी निस्वार्थ योगदान आम्हाला आठवतं, त्यांनी अमेरिका-हिंदुस्थानच्या मैत्रीसंबंधांचा ऐतिहासिक अध्याय सुरू केला. हिंदुस्थानच्या विकास आणि समृद्धीबद्दलचे त्यांचे समर्पण आम्हाला सतत प्रेरणा देत राहील.”