आजपासून काय काय बदलणार?

नवीन वर्षात अनेक मोठे बदल होणार आहेत. काही बदल फायद्याचे, तर काही बदल खिसा कापणारे ठरणार आहेत. नव्या वर्षात यूपीआय पेमेंटची मर्यादा दुप्पट होणार आहे. तसेच कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. बळीराजाला विनातारण 2 लाख कर्ज मिळू शकणार आहे, तर कार व व्यावसायिक वाहने महागणार आहेत. त्यामुळे हौसेमोजेला आवर घालावी लागणार आहे. फोन जुना असेल तर व्हॉट्सअॅप चालणार नाही. त्यामुळे या फीचरशिवाय ज्यांचे चालत नाही त्यांना नवा मोबाईल खरेदी करावा लागेल. शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय आजपासून 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांना विनातारण 1.6 लाख कर्ज मिळते.

प्रदूषणाचे नियम कडक

प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने 1 एप्रिलपासून नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. त्यानुसार कठोर उत्सर्जन मानदंड भारत स्टेज-7 म्हणजेच बीएस-7 लागू करण्यात येणार आहे.

कोहली येणार, रोहित जाणार

क्रिकेटमध्येही कर्णधार कोहली आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. तो पुन्हा आरसीबीचा कर्णधार असेल. तर कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

ढकलपास बंद

नो डिटेंशन पॉलिसी रद्द करण्यात आल्याने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पाचवी ते आठवी ढकलपास बंद होणार आहे.

16 वर्षांनंतरच कोचिंगमध्ये प्रवेश

कोचिंग सेंटरमध्ये 16 वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. दिशाभूल करणाऱया जाहिरातींवर दंड आकारण्यात येणार आहे.

‘अग्निवीर’साठी 10 टक्के आरक्षण

सीआयएसएफ आणि बीएसफमध्ये माजी अग्निवीर जवानांसाठी 10 टक्के आरक्षण असेल. शारीरिक चाचणी आणि वयोमर्यादेतही शिथिलता असणार आहे.

नवीन वर्षात 136 वंदे भारत एक्स्प्रेस

भारतीय रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्या, 1 जानेवारीपासून लागू होणार असून अनेक गाड्यांच्या वेळाही बदलण्यात येणार आहेत. नव्या वर्षात आणखी 136 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वेगाड्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज करण्यावर भर देणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

जानेवारीत 11 दिवस बँका बंद

नव्या वर्षात विविध राज्ये आणि शहरांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात 4 रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार व्यतिरिक्त 5 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँकांचे कामकाज बंद असेल. त्यामुळे बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास आधी सुट्ट्यांची यादी तपासावी लागेल.

उद्या, 1 जानेवारी रोजी चेन्नई आणि कोलकाता येथील बँकांना सुट्टी आहे. 14 जानेवारीला मकर संक्रातीनिमित्त अहमदाबाद, अमरावती, भुवनेश्वर, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद आणि लखनौ येथील बँका बंद असतील. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी भुवनेश्वर आणि कोलकात्यातील बँकांना सुट्टी असेल. 15 आणि 16 तारखेला चेन्नईतील बँका बंद असतील.

यूपीआय पेमेंटची मर्यादा दुप्पट

यूपीआयद्वारे आजपासून 10 हजारांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येईल. सध्या 5 हजारांपर्यंत व्यवहार करता येतात.

कोणत्याही बँकेतून काढा पेन्शन

निवृत्तीवेतनधारकांना नव्या वर्षात कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.

कार, व्यावसायिक वाहने महागणार

कार व व्यावसायिक वाहने नव्या वर्षात 2 ते 3 टक्क्यांनी महाग होणार आहेत. यात मारुती, ह्युंदाई, टाटा, किया व एमजीच्या गाड्यांचा समावेश असेल.

कॉलिंगसाठी वेगळे रिचार्ज लागणार

टेलिकॉम कंपन्यांना व्हॉईस आणि एसएमएस पॅकचा पर्याय द्यावा लागेल. ज्या मोबाईलधारकांना डेटा नको आहे त्यांच्यासाठी नवीन पॅक स्वस्त असेल. म्हणजेच कॉलिंगसाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल. केवळ कॉलिंगसाठी फोन वापरतात त्यांनाही डेटासाठी रिचार्ज करावे लागते.

जुन्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप कोमात

अँड्रॉईड 4.4 व आधीच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप फीचर काम करणार नाही. अ‍ॅपचे मेटा एआय हे फिचर अपडेट मोबाईलवर चालेल.

पालिकेत फेस रीडिंग हजेरी!

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डमध्ये उद्यापासून ‘फेस रीडिंग’ हजेरी लावण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने सुमारे दोन हजार मशीन्स घेतल्या असून त्या विभागनिहाय बसवल्या गेल्या आहेत. ही पद्धत काही वॉर्डमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात झाली होती. आता सर्व कार्यालयांत याची अंमलबजावणी होईल. पालिकेत सध्या कार्यरत असणाऱ्या 93 हजार कर्मचाऱ्यांना ही हजेरी लावणे बंधनकारक राहणार आहे. ही हजेरी पगाराशीही लिंक असेल. त्यामुळे हजेरी नीट लागली नाही तर पगार कापला जाऊ शकतो.