
पोलीस कोठडीत दिले जात असलेले जेवण बेचव असल्याची तक्रार मनोरमा खेडकर हिने आज न्यायालयात केली. दरम्यान, पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱयाला धमकावल्या प्रकरणी कोठडीची हवा खात असलेल्या मनोरमाच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवस वाढ करण्याचा आदेश पौड न्यायालयाने दिला आहे.
शेतकऱयाला धमकावल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांनी मनोरमा खेडकरसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खेडकर यांना महाड परिसरातून अटक करण्यात आली होती. याबाबत 65 वर्षीय शेतकऱयाने फिर्याद दिली आहे.
अटक केल्यानंतर न्यायालयाने खेडकर हिला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुह्याच्या सखोल तपासासाठी, खेडकरच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत पोलीस कोठडीत वाढ केली. दरम्यान, पोलीस कोठडीमध्ये चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार खेडकर हिने केली. पोलीसांनी तिचे आरोप फेटाळून लावले.