मनोरमा खेडकर यांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याचं प्रकरण

प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची फरार आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयाने 20 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयानं 20 जुलैपर्यंतची (तीन दिवसांची) पोलीस कोठडी मागितली होती.

दरम्यान, खेडकर यांच्यासह आणि इतर सहा जणांविरुद्ध एफआयआरमध्ये आयपीसीचे कलम 307 जोडलं गेलं, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या फरार आईला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील पौड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाडमधील पाचाड येथील एका हॉटेलमधून मनोरमा यांना ताब्यात घेतले. या हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर या ‘इंदुबाई’ बनून रहात असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोरमा खेडकर यांनी रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर सदर शेतकऱ्याने खेडकर दाम्पत्याविरोधात तक्रार केली. याप्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधीत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते. शोध घेत असताना खबऱ्यामार्फत पोलिसांना मनोरमा खेडकर या महाडमधील पाचाड येथील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक मनोरमाला ताब्यात घेण्यासाठी महाडकडे रवाना झाले.

मनोरमा खेडकर एका मुलासोबत महाडच्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. बुधवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास हुंडाई कंपनीच्या कारने (क्र. एमएच 14, एसयू 4877) त्या हॉटेलमध्ये आल्या होत्या. दोघांनीही आम्ही मायलेक असल्याची माहिती हॉटेल मालकाला दिली होती.

यासंबंधी हॉटेल मालक अनंत यांनी माहिती देताना सांगितले की, मनोरमा यांनी आपले नाव इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे आणि त्यांच्यासोबच्या मुलाने दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे असे सांगितले होते. हॉटेलच्या रजिस्टरमध्येही तशी नोंद करत आम्ही मायलेक असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांनी एक रुम बूक केली. मात्र बुधवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास महिला कॉन्सेटबलसह पोलिसांचे एक पथक येथे आले आणि मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेऊन सकाळी साडे सहाच्या सुमारास निघून गेले.

दरम्यान, रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस मनोरमा यांचा शोध घेत होते, मात्र त्या वारंवार पोलिसांना गुंगारा देत होत्या. त्यांचा फोनही बंद लागत होता. पोलिसांच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले नव्हते. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर मनोरमा यांना महाडमधून अटक करण्यात आली असून त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे.