वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकामध्ये याची नोंद करून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन जात आहेत. तिथे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती मिळतेय.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी रिव्हॉल्व्हर रोखून एका शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सदर शेतकऱ्याने खेडकर दाम्प्त्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर व दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यापासून मनोरमा खेडकर या बेपत्ता होत्या. त्या महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना हॉटेलमधून ताब्यात घेतले.
बुधवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास मनोरमा खेडकर यांनी महाडमधील एका हॉटेलमध्ये रुम घेतली होती. यावेळेस त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे या नावाने त्यांनी रूम घेतली होती. दोघांनी आम्ही मायलेक असल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांनी मिळताच रात्री दोनच्या सुमारास पोलीस महाडमध्ये दाखल झाले आमि सकाळी साडे सहाच्या सुमारास मनोरमा यांना ताब्यात घेऊन पुण्याला रवाना झाले.
पुणे पोलिसांची नोटीस
दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा यांना नोटीस पाठविली होती. त्यानुसार त्यांचा शस्त्र परवाना रद्द का करू नये, अशा प्रकारची विचारणा केली होती. ‘तुम्ही शस्त्राचा दुरूपयोग करून परवानाविषयक अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून, 10 दिवसांत लेखी म्हणणे मांडावे, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यकाही करण्यात येईल.’ अशा आशयाची नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली होती.
पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत मिळवलं अपंगत्व प्रमाणपत्र
काय आहे प्रकरण?
धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असे सांगितले जात आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझे नाव आहे, असे त्या शेतकऱ्यांना दरडावून सांगताना दिसत आहेत. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी त्यांच्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरने दमदाटी करताना व्हिडीओ व्हायरल