…तर तिथेच हाणामारी झाली असती, मनोज तिवारीने गौतम गंभीरबाबत केले धक्कादायक खुलासे

टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. मनोजने दिलेल्या एका मुलाखतीत गौतम गंभीरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघात एकच खळबळ उडाली आहे. मनोजने सांगितले की, दोघांमध्ये इतका वादा झाला होता की ते प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले असते. काही दिवसांपूर्वी मनोज तिवारीने गौतम गंभीर याला ढोंगी असल्याचेही म्हटले होते.

मनोज तिवारी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये 2013 साली आयपीएल दरम्यान वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी गौतम गंभीर टीम इंडियाचा कर्णधार होता. मनोज तिवारीने लल्लनटॉपला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गंभीरसोबत आधीही वाद झाला असल्याने त्याचा आधीपासूनच माझ्यावर राग होता. केकेआर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स मध्ये माझी फलंदाजी समाधानकारक नव्हती आणि त्यावेळी माझी हिंदुस्थानी संघात जागाही निश्चित होत नव्हती. एकदा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात मी 129 सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या सामन्यावेळीही तो भडकलेलाच होता. फलंदाजी संपल्यानंतर मला क्षेत्ररक्षण करावे लागले. मी सनस्क्रीन लावत होतो आणि अचानक त्याला राग आला. तू काय करत आहेस? लवकर खाली जा असा तो अंगावर खेकसला.

मनोज तिवारी पुढे म्हणाले,त्याच्या या वर्तणुकीमुळे मी अस्वस्थ झालो होतो. ईडन गार्डनमध्ये सामन्या दरम्यान फलंदाजी झाल्यानंतर मी वॉशरुमला गेलो आणि तो मागून आला आणि तुझे हे असे अॅटिट्यूड चालणार नाही. हे असे अॅटीट्यूड दाखवशील तर संघात खेळायला देणार नाही असा इशाराच दिला. तो माझ्यासाठी सिनीअर असल्याने मी त्याचा आदर करत होतो. मात्र त्याच्या तशा बोलण्याने मीही संतापलो.

तो गंभीरला म्हणाला, गौती भाऊ, हे असे चालणार नाही असे बोललो. दरम्यान तिथे वसीम अक्रम आला आणि त्याने आमचा वाद थांबवला. अन्यथा त्यादिवशी हाणामारी झाली असती.त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा एकदा आम्ही एकमेकांसमोर आलो.तिवारी पुढे म्हणाला, ‘मी लेग गार्ड घालत असताना तो स्लिमवर उभा होता आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. अशा शिव्या ज्या सांगूही शकत नाही. मी कधीही माझ्या आई किंवा बहिणीवरुन कोणाकडूनही शिवी ऐकून घेतली नव्हती. पण तरीही रागावर नियंत्रण ठेवून मी त्याला विचारले, गौती भाऊ,का शिव्या देत आहेस? त्यावेळी तो म्हणाला संध्याकाळी भेट तुला बघतोच. मग माझाही राग अनावर झाला आणि त्याला म्हणालो संध्याकाळी कशाला आताच बघ ना. अखेर पंच मध्ये येऊन त्यांनी थांबवल्याचे मनोज तिवारी याने सांगितले.