श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदाचा कार्यभार पंढरपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनोज श्रोत्री यांच्याकडे श्री मंदिरातील व्यवस्थापकाचा कार्यभार देण्यात आला आहे.
मनोज श्रोत्री हे 1995 ला महसूल शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी महसूल विभागात विविध पदावर कामकाज केलेले आहे. 2016 पासून पंढरपूर व मंगळवेढा प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच निवासी नायब तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय पंढरपूर येथे कामकाज पाहिले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माढा तहसिल कार्यालय येथे नायब तहसिलदार येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दि. 1 ऑगस्ट पासून श्रोत्री यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत. श्रोत्री यांनी व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्विकारला आहे.