
महान अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले, मनोज कुमार हे अभिनेता तर होतेच पण ते राष्ट्रभक्तही होते. त्यांच्या चित्रपटातून हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. मनोज कुमार यांचा जन्म भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 24 जुलै 1937 रोजी अबोटाबाद, लाहोर, वायव्य सरहद्द प्रांत, पाकिस्तान येथे झाला होता. मनोज कुमार यांचे मुळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. फाळणीनंतर ते दिल्लीतील निर्वासित छावणीत आपल्या कुटुंबासह वाढले. चित्रपटांची आणि अभिनयाची ओढच मनोज कुमार यांना मुंबईपर्यंत घेऊन आली. मनोज कुमार 1956 मध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदा आले होते.
मनोज कुमार यांचा पहिला चित्रपट कधी रिलीज झाला?
मनोज कुमार यांचा पहिला चित्रपट 1957 मध्ये रिलीज झाला होता, यात त्यांनी 90 वर्षांच्या भिकाऱ्याची भूमिका केली होती. यानंतर त्यांनी अनेक विस्मृतीत गेलेले चित्रपट केले. ज्यात 1962 मध्ये विजय भट्टच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटांसह मनोज कुमार यांना यश मिळाले. ‘वो कौन थी’, ‘गुमनाम’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांच्याकडे होते, परंतु मनोज कुमार यांचा अमर शहीद (1965) चित्रपटातील भगतसिंग हा सर्वात अविस्मरणीय अभिनय होता. शहीद (1965), उपकार (1967), पूर्वा और पश्चिम (1970), रोटी कपडा और मकान (1974), क्रांती (1981) यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
मनोज कुमार हे 1960 आणि 1970 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपली छाप पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली. संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक स्टुडिओमध्ये घोस्ट रायटर म्हणूनही काम केले होते. याकरता त्यांना प्रत्येक दृश्यासाठी 11 रुपये मिळत होते.
हा चित्रपट बनवण्यासाठी मनोज कुमारने आपले घर विकले
1981 मध्ये प्रदर्शित झालेला ‘क्रांती’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि प्रदर्शित होताच त्याने कमाईचे अनेक विक्रम मोडले. रिपोर्ट्सनुसार, मनोज कुमार यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मोठा त्याग केला होता. चित्रपटाच्या खर्चासाठी त्यांनी जुहूमधील त्यांचे राहते घरही विकल्याचे म्हटले जाते. या चित्रपटासाठी त्यांनी दिल्लीतील आपले घरही विकले होते. सर्व अडचणी आणि आव्हानांना न जुमानता, मनोज कुमार यांनी ‘क्रांती’ पूर्ण केला आणि सुमारे 3 कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 16 कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती.