मनोज जरांगेंची तब्येत ढासळली

उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती अजूनच खालावली. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय उपचार घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, उपचार करणारे डॉक्टर हे देवेंद्र फडणवीसांचे असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 16 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती अजूनच खालावली. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून रक्तदाब आणि साखरेचे प्रमाणही घटले आहे. आज त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्यामुळे जरांगे आज दिवसभर झोपूनच होते. शासनाचे वैद्यकीय पथक नियमित तपासणीसाठी आले होते. वैद्यकीय पथकाने जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. परंतु जरांगे यांनी ही विनंती धुडकावून लावली.

काल कमी असलेली साखर आज कशी वाढली? तपासणीस आलेल्या डॉक्टरांची खरडपट्टी

काल करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत रक्तातील साखरेचे प्रमाण 71 होते. हे प्रमाण आज 85 कसे झाले? माझी साखर कमी होण्याऐवजी वाढली कशी? माझी तब्येत व्यवस्थित असल्याची खोटी माहिती तुम्ही सरकारला देत आहात, तुम्ही देवेंद्र फडणवीसांना मॅनेज आहात, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना खडसावले.

जरांगे यांच्या समर्थनार्थ आज बीड बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आज मराठा समाजाच्या वतीने ‘बीड बंद’ची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. बीड येथे जिल्हाधिकाऱ्यांना तसेच तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.