मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली आहे. ‘कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही. मात्र, आमच्या मागण्या सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया, मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा 57 लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली.
शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी यासोबतच 13 जुलैपूर्वी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं असं मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितलं.
ओबीसींच्या आंदोलनाचासंदर्भ देत म्हणाले की, ‘आरक्षण असून ते इतके लढत आहेत, तर आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती लढू’. आरक्षण असणारे लोक असं लढत आहेत तर आरक्षण नाहीत ते चौपट ताकद लावून लढतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातील, सगळ्या संघटनेतील कामगार एक होतील असा विश्वास व्यक्त करतानाच आम्हाला आरक्षण नाही ते मिळावं म्हणून ताकदीनं लढणार आहे. मतभेद सोडून मराठा समाजाचे लोक मुलांसाठी लढणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलं.