सत्ताधारी मिंधे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. असे चित्र असतानाच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या अंतरवाली सराटी येथील बैठकीत मोठी घोषणा केली. आता आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करून ‘फडणवीसांची जिरवणार, त्यांचे सगळे आमदार पाडणार’, असा निर्धार देखील केला आहे.
‘प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यात ऐक्य आवश्यक आहे. आता मागे हटणार नाही. आपल्याला आरपारचं एक उपोषण 29 सप्टेंबर पासून करायचं आहे. कायमचं आणि राज्यभर करायचं. यांची मस्ती, मग्रुरी सगळी कमी होईल. कारण हे शांततेच्या आंदोलनाला सगळ्यात जास्ती भितात. रस्त्यावरच्या आंदोलनाला हे भित नाहीत. 29 सप्टेंबरला आरपारचं आंदोलन करायचं’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की निवडणुकीत आपण सत्ताधाऱ्यांना पाडूच. पण हे लोक निवडणुका आणि रस्त्यावरच्या आंदोलनाला घाबरत नाही. मला समाजाला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच. सगळे आमदार पाडायचे. पण हे निवडणुकांना घाबरत नाहीत, रस्त्यावरच्या आंदोलनांना घाबरत नाहीत. म्हणून 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.