![jarange (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/jarange-1-696x447.jpg)
मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हलक्यात घेण्याची चूक करू नये, असा सज्जड दम मराठा आंदोलक मनोज जरांगे–पाटील यांनी दिला. मात्र यानंतरही ट्रिपल इंजिन सरकारने आज मराठा आंदोलनातील 6 कार्यकर्त्यांसह एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई केली. यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याचादेखील समावेश आहे. या 9 जणांना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.
वाळूतस्करी व इतर गुह्यांतील नऊ आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसुरराव तौर, वामन मसुरराव तौर अशी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्रास द्याल तर सोडणार नाही -जरांगे
पोलीस प्रशासनाने 9 जणांना तडीपार केल्यामुळे संतापलेले मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांना त्रास द्याल तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला. माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची नावे तडीपारीच्या यादीत घातली जात आहेत. गादी मिळाल्यानंतर माज आल्यासारखी ही वागणूक आहे. मराठा बांधवांच्या भवितव्याशी खेळत आहेत. केसेस कमी करण्याऐवजी वाढवायला लागलेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.