आरक्षण न दिल्यास मराठ्यांचा दणका दाखवेन, मनोज जरांगे यांचा इशारा

देवेंद्र फडणवीसांना की मला मस्ती आली हे मराठा समाजाला माहीत आहे. तुम्ही आरक्षण द्या, विषय संपला. तुम्ही आरक्षण न दिल्यास, मराठ्यांचा दणका कसा असतो ते दाखवतो, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलताना दिला.

ते म्हणाले की, काही आमदार, संघटना, अभ्यासक व समन्वयक फोडाफोडीचे काम करत आहेत. तुम्हाला गरीब मराठ्यांची पोरं मोठी व्हावी असे का वाटत नाही.? तुम्ही महाविकास आघाडीवर का ढकलता. तुम्ही आरक्षण द्या, हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आरक्षण दिल्यास तुम्हालाही फायदा होईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

समाजाचा उपोषणाला विरोध असतानाही समाजातील लेकरं मोठी होण्यासाठी हे उपोषण करतो, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये, यासाठी एकजुटीने एकमताने लढायचे असून उपोषण मागे घेतले नाही, तर स्थगित केले होते. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यासाठी पुन्हा उपोषण सुरू करतो. मी गरीबांसाठी लढाई लढतो, राजकीय भूमिका घेत नाही, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पाठीमागे म्हणाले होते, महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत फायदा झाला. त्यांच्याकडून लिहून घ्या, ओबीसीतून आरक्षण देणार का म्हणून लिहून घ्या. असे लिहून घ्यायची गरज नाही. तुम्ही द्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, तुम्हाला फायदा होईल. थोडं थांब, सगळं होईल असे सांगितले जाते. मात्र वेळेवर तोफ धडाडलीr की फुसका बार होतो. मराठ्यांच्या विरोधात गेलेला पक्ष आणि नेतेसुद्धा संपले आहेत. आता आचारसंहिता लागण्याआधी आरक्षण देऊ नका, मग ही जनता, शेतकरी आणि मराठे तुमचा हिशेब चुकता करणार, असा इशारा जरांगे यांनी दिला.

फडणवीसांनी इडब्ल्यूएस आरक्षणाचे वाटोळे करून आम्हाला एक वर्ष आरक्षणाची वाट बघायला लावली. आमचा एवढा अंत बघायला नको होता. सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी झाली नाही. तीनही गॅजेट लागू झाले पाहिजेत. केसेस मागे घेतो म्हटले होते, त्यावर काही झालं नाही, व्हॅलिडीटी देणेही बंद केले. मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळावा यासाठी 16 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून मी उपोषणाला बसणार आहे. कोणी काम सोडून आंतरवालीकडे येऊ नका, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.