येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या पाडणार याबाबत निर्णय घेऊ. राज्य सरकारला संधी दिली होती. मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही. त्यामुळे आता युद्ध अटळ असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते.
जरांगे म्हणाले की, निवडणूक लढण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र समाजाची होती. त्यामुळे मला त्यांचे ऐकावे लागते. आता लढणार, पाडणार आणि जिरवणार आहे. आम्ही कुठलाही पक्ष टार्गेट करत नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आरक्षण मिळू दिले नाही हे खरे आहे. एकनाथ शिंदे यांना नुकसान होईल की नाही, याबाबत दोन दिवसानंतर विचार करू, असे ते म्हणाले. आम्ही काल सगळ्यांनी अर्ज भरून घ्या असे म्हटले होते. पण सगळ्यांनी भरू नका. दोन ते तीन जणांची निवड करून त्यांनीच अर्ज भरा. ज्या दिवशी एक नाव घोषित होईल तेव्हा बाकीच्यांनी अर्ज मागे घ्या. फक्त एक अर्ज ठेवणार. आपण एसटी, एससी उमेदवार देणार नसून व जिथे उमेदवार उभे करायचे नाहीत, तिथे विचाराशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने पाचशे रुपयांच्या बाँडवर आमच्या मागण्यांशी सहमत असल्याचे लिहून बॉण्ड घ्यायचा, असं ठरलं होतं’ पण उलटेच घडले. बॉण्ड म्हटले की कोणीही बॉण्ड देउâ लागल्याचे ते म्हणाले.
आम्हाला काही तुम्हाला खर्चात पाडायचे नाही. आम्ही तुमच्या मागण्यांशी सहमत आहोत. हे आधी आमच्याशी संवाद साधा, नंतर बॉण्ड द्या. संवाद साधल्याशिवाय कोणीही बॉण्ड देऊ नये. कारण आम्हाला तिथले समीकरण पाहणे, काम पाहणे आहे. मी काल व्यासपीठाच्या खाली उतरताच तातडीने एका जणाने बॉण्ड दिला. पण तुमचे मेरीट देखील बघावे लागणार आहे. एका मतदारसंघातून पन्नास – शंभर बॉण्ड आले तर उगाच खर्च वाढेल. त्यामुळे बॉण्ड देण्यापूर्वी आम्हाला एकदा विचारा, जिथे आम्ही लढणार नाही, तिथला हा विषय आहे. आंतरवाली सराटीकडे चार दिवस कोणीही येऊ नका, मला मोकळं सोडा, असेही ते म्हणाले.