फडणवीस यांची जिरवणारच, भाजपचे सर्व आमदार पाडणार; मनोज जरांगे यांचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण

राज्यात जातीय विद्वेषाचे वातावरण निर्माण होण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. मराठा आरक्षणात अडथळे आणणार्‍या फडणवीसांची जिरवणारच, भाजपचे सर्व आमदार पाडणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला महिनाभराची मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण आंदोलनाला आज वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने गोदाकाठावरील 123 गावांची आंतरवालीत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आंदोलनाची समीक्षा करण्यात आली. त्यानंतर मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सरकारला महिनाभराचा अवधी देण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत निर्णय न घेतल्यास 29 सप्टेंबरपासून आपण पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. ही आरपारची लढाई असेल असेही ते म्हणाले.

फडणवीसांना अद्दल घडवणारच

मराठा आरक्षणाच्या मार्गात देवेंद्र फडणवीस अडथळे आणत आहेत. त्यामुळे त्यांची जिरवणारच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे सगळे उमेदवार पाडणार असेही ते म्हणाले. गिरीश महाजन म्हणजे 15 रुपयांचा बेल्ट असून मराठा आरक्षण म्हटले की यांचे पोट दुखते असा टोला त्यांनी लगावला. आता दिवाळीला आनंदाचा शिधा देतील. त्यातील डाळही शिजत नाही, तेलही उकळत नाही असेही ते म्हणाले.