मला कधीही अटक होण्याची शक्यता – मनोज जरांगे

राज्य सरकारने मराठय़ांना दिलेले दहा टक्के न टिकणारे आहे. सरकारने आमची फसवणूक केली आहे. सत्तेत मी काटा आहे. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात असून मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल तयार झाला असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज केला.

मनोज जरांगे यांनी आज नांदेड, लोहा तसेच बीड जिल्हय़ात गवळवाडी, अंथरवणपिंप्री, उंबरी फाटा, म्हाळसजवळा, पिंपळगाव, पिंपळनेर, लोणी, नाथापूर, जातेगाव येथे मराठा समाजाशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आरक्षणावरून राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीवर निशाणा साधला. राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण फसवे आहे. ते न्यायालयात टिकणारे नाही. जर मराठा समाज मागास हे विधिमंडळाच्या पटलावर मान्य करता मग ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण का देत नाही, असा सवालही त्यांनी केला.

कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र देण्यात येत नाहीत, सग्यासोयऱयांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी नाही, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. हे सरकार मराठय़ांची फसवणूक करत आहे. आता तर आंदोलनाची एसआयटी चौकशीच लावली आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर चौकशी करावी, मी सामोरा जायला तयार आहे. या चौकशीत सरकारचेच मंत्री अडकतील, असा इशारा या वेळी मनोज जरांगे यांनी दिला. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

विनापरवानगी सभा घेतली, गुन्हा दाखल
मनोज जरांगे हे सोमवारी रात्री नांदेडला पोहोचले. रात्री दहा वाजता त्यांनी मंगल कार्यालयात मराठा समाजाशी संवाद साधला. या सभेसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे जरांगे यांच्यासह संयोजक श्याम वडजे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक चालू ठेवणे आदी कारणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.