पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता सर्वसामान्यांची गरज राहिली नाही. नाशिक, मुंबई दौर्यात कुठेही त्यांनी मराठा आरक्षणावर अवाक्षरही काढले नाही. मुख्यमंत्र्यांना निवडणुकीपुरते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ पाहिजेत. त्यांनाही आता समाजाची गरज राहिली नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले.
पंतप्रधान शिर्डी दौर्यावर आले होते त्यावेळी मनोज जरांगे यांनी पंतप्रधानांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. परंतु पंतप्रधानांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. पंतप्रधान मोदी हे आज नाशिक तसेच मुंबई दौर्यावर आले होते. आजतरी ते मराठा आरक्षणावर बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु आजही त्यांनी मराठा आरक्षणावर मुग गिळले.
पंतप्रधानांच्या या दौर्यावर मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना टीकेची झोड उठवली. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांना आता सर्वसामान्यांची गरज उरली नाही. आमच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. परंतु आवाज उठवूनही आम्हाला न्याय मिळत नाही. आता त्यांच्या पाया पडण्याची गरज नाही. आम्ही आता लढून आरक्षण मिळवू असे मनोज जरांगे म्हणाले.
मुंबईत जाणारच
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईत येण्याची गरज पडणार नाही असे सरकार म्हणते. परंतु आता आमचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३ कोटी मराठे मुंबईत धडकणारच असा आत्मविश्वास यावेळी मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मराठ्यांची ताकद सरकारला पुण्यात दिसेल असा इशाराही त्यांनी दिला.