मराठ्यांना वेडं समजता काय, दहा टक्के आरक्षण म्हणजे गाजर! मनोज जरांगे यांनी सरकारला फटकारले

राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण म्हणजे गाजर आहे. सरकारने दिलेले हे आरक्षण कोणत्याही कसोटीवर टिकणारे नाही. मराठ्यांना वेडं समजता काय, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले. मनोज जरांगे यांनी आज नांदेड, लोहा तसेच बीड जिल्ह्यात गवळवाडी, अंथरवणपिंप्री, उंबरी फाटा, म्हाळसजवळा, पिंपळगाव, पिंपळनेर, लोणी, नाथापूर, जातेगाव येथे मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणावरून राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीवर निशाणा साधला.

राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण फसवे आहे. ते न्यायालयात टिकणारे नाही. जर मराठा समाज मागास हे विधिमंडळाच्या पटलावर मान्य करता मग ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण का देत नाही, असा सवालही त्यांनी केला. कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र देण्यात येत नाहीत, सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी नाही, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. हे सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे. आता तर आंदोलनाची एसआयटी चौकशीच लावली आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर चौकशी करावी, मी सामोरे जायला तयार आहे. या चौकशीत सरकारचेच मंत्री अडकतील, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

विनापरवानगी सभा घेतली, गुन्हा दाखल
मनोज जरांगे हे सोमवारी रात्री नांदेडला पोहोचले. रात्री दहा वाजता त्यांनी मंगल कार्यालयात मराठा समाजाशी संवाद साधला. या सभेसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, त्यामुळे जरांगे यांच्यासह संयोजक श्याम वडजे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक चालू ठेवणे आदी कारणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.