देवेंद्र फडणवीस कुणालाही अंगावर घालू नका नसता लोकसभेत दाखवला तसा विधानसभेत पुन्हा इंगा दाखवेन, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभेच्या निकालानंतर तरी सरकारने जागे व्हावे आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. मराठा समाजाच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम लोकसभेत दिसून आले आहेत. या निवडणुकीत मराठा समाज एकवटला आणि त्याने आपली ताकद दाखवून दिली, असे जरांगे म्हणाले.
आरक्षणाबाबत आता तरी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेच्या राज्यातील सर्व 288 जागा लढवेल, असा इशाराही त्यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद सर्वांना दिसली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता कुणालाही अंगावर घालू नये. नसता विधानसभेत पुन्हा इंगा दाखवेन, असा थेट इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला. प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. ते पडायला नको होते, अशी भावनाही जरांगे यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाची कारणमीमांसा करावी, असा टोलाही त्यांनी व्यक्त केला.