राज्य सरकार ओबीसींच्या नेत्यांचे लांगूलचालन करून मराठा समाजाचा अपमान करत असल्याचा स्पष्ट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मराठा समाजाशी चर्चा करूनच घेणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आरक्षण धोरणावर कडाडून टीका केली. सत्ताधार्यांनी गोरगरीब मराठ्यांना डावलण्याचेच ठरवले आहे. सरकार ओबीसी नेत्यांची लाचारी करत असून मराठा समाजाचा अपमान करत आहे. याचे परिणाम सत्ताधार्यांना भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. सध्या आम्ही फक्त मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांबद्दलची माहिती घेत आहोत. २९ ऑगस्टनंतर प्रत्यक्ष उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि त्यानंतर मराठा समाजाच्या व्यापक बैठकीत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.