
परळीतील ज्यांच्या कार्यालयात खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले. त्या मंत्र्यांना सहआरोपी केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचविले,असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
जरांगे यांनी मुळशी तालुक्यातील नेरे येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले, संतांची भूमी असलेला बीड जिल्हा बदनाम झाला आहे. राजकीय स्वार्थासाठी गुंड टोळ्यांच्या माध्यमातून खून केले जात आहेत. सत्तेतून पैसा, संपत्ती कमावणे यामुळे बीड जिह्यात नागरिकांना त्रास झाला आहे. हे थांबविण्यासाठी समाजाने खोटय़ाला खोटे म्हटले पाहिजे. विशेष करून शासनाने खोटय़ाची पाठराखण करू नये, अशी अपेक्षा होती. संतोष देशमुख हत्येतील सहआरोपी यांना राजकीय पाठबळामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचवले आहे. त्यामुळे सह आरोपी करण्याची मागणी करण्याचे बंद करावे लागले आहे.
वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती, असा दावा बीडचा निलंबित फौजदार रणजित कासले याने केला आहे. याबाबत तपासत सत्य पुढे येईल, असे जरांगे म्हणाले.
फडणवीसांचे सगेसोयरे असल्याने दीनानाथवर कारवाई नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सगेसोयरे असल्याने गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान करणाऱयांनाही सोडले जाते. शेतकऱयांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन फसवले. सत्ता हातात आली म्हणून अत्याचार केल्यास जनता सोडणार नाही’.