निवडणूक लढवणार नाही, आता उमेदवार पाडणार; मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार

राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला होता. विधानसभा निवडणुकीतही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र आता निवडणूक लढणार नाही, पण उमेदवार पाडणार असे म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्यासंदर्भात मित्र पक्षांची यादीच आली नाही. त्यामुळे आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. निवडणूक एका जातीवर लढणे शक्य नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

जरांगे पाटलांचं समर्थन मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवारानं स्वत:चंच वाहन जाळलं, असा उघड झाला काका-पुतण्याचा बनाव

मतदारसंघ निश्चित झाले होते. उमेदवारांची नावेही निश्चित झाली होती. मात्र मित्रपक्षांनी त्यांची यादीच पाठवली नाही, असा आरोप जरांगे यांनी केला. निवडणूक लढवणार नाही, आता उमेदवार पाडणार असे म्हणत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.

सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे. ही माघार नसून गनिमी कावा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.