दलित, मुस्लिम आणि मराठा मतांची मोट बांधणार, मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा

राज्यातील काही मतदारसंघात आपण उमेदवार देणार असल्याची घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी केली. दलित, मुस्लिम तसेच मराठा मतांची मोट बांधून विजय मिळवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी देवेंद्रतात्यांकडून आपण बरंच काही शिकलोय, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.

मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी, आनंदराज आंबेडकर यांनी आज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी 4 नोव्हेंबरपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असे सांगितले. काही मतदारसंघात आपण उमेदवार देणार आहोत, उर्वरित सर्वांनी बिनबोभाट आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे असेही ते म्हणाले. राज्य सरकारकडून आता कोणतीही अपेक्षा नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचा ठाम विश्वास मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला.

फडणवीस मराठय़ांना हलक्यात घेतात

फडणवीस मराठय़ांना हलक्यात घेतात. पण आता राजकारणातील मग्रुरीला धडा शिकवण्याची वेळ आली. मराठा समाजाने कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नये, असे ते म्हणाले.