![manoj jarange](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/manoj-jarange-696x447.jpg)
आमदार सुरेश धस कट्टर आणि निर्भीड माणूस होता. एवढ्या लवकर गुडघे टेकवेल असे वाटले नव्हते. पण बसही गद्दार निघाले, अशा संतप्त शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी घस-मुंडे भेटीवर आपल्या भावना व्यक्त केल्या,
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रान पेटवणारे भाजप आमदार सुरेश धस आणि या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्याच्या बातमीने अवघा महाराष्ट्र अवाक् झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीमुळे आमदार धस यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव आला असेल पण त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आमदार बस यांना ही भेट टाळता आली असती असेही ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना भेटायला जायला ते काय आयसीयूत दाखल होते का कोमात, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
संतोष देशमुख यांची झालेली अमानुष हत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाज शेवटपर्यंत लढेल असेही जरांगे म्हणाले,
साखळी उपोषण पुढे ढकलले
राज्य सरकारने मराठा समाजाच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. इतर मागण्यांवर सरकार काम करताना दिसत आहे. त्यामुळे सरकारला वेळ द्यावा लागेल म्हणून 15 फेब्रुवारीपासून राज्यभर सुरू करण्यात येणारे साखळी उपोषण 15 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. या मुदतीत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.