मराठा समाज हा लढवय्या आहे. तो शांत बसणारा नाही. सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केले तर मराठा समाज घरातून बाहेर पडेल. मग सत्ताधाऱयांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांनी रविवारी रात्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझे आणि मराठा समाजाचे समीकरण जुळले असते आणि निवडणुकीच्या मैदानात उतरलो असतो तर यांचा सुफडा साफ केला असता. मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणारही नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, मराठा आरक्षण देण्याची सरकारला सुबुद्धी द्यावी, असे साकडे आपण श्री विठ्ठल-रुक्मिणीला घातल्याचे ते म्हणाले.
जरांगे-पाटील म्हणाले, राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मी आरक्षण घेणार आणि ओबीसीमधूनच घेणार, यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवालीच्या घराघरांत उपोषण केले जाणार आहे.