‘लढायचं की पाडायचं’ याचा लवकरच निर्णय; मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार अद्यापही ठोस निर्णय घेत नसल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता ‘लढायचं की पाडायचं’ याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचा इशारा त्यांनी आज रविवारी दिला. मराठा समाजातील नेत्यांशी, संघटनांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार असून मराठा आरक्षण जनजागृतीसाठी शांतता संवाद रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज रविवारी गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच थेट आंतरवाली सराटीकडे निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठय़ांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल, हक्काचं आरक्षण देत नसेल तर आम्हाला ठोस निर्णय घ्यावाच लागेल. आमच्या समाजासाठी आम्हाला सरकारच्या पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. आम्हाला ज्या क्षेत्रात जायचं नाही, पण तिथे जायची वेळ सत्ताधारी आमच्यावर आणत आहेत. माझ्या समाजाचे हित कशात आहे याचा निर्णय घ्यावा लागेल. आमच्या समाजातील नेत्यांशी, संघटनांशी बोलून 29 ऑगस्टला याबाबत निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

जनतेचा आक्रोश समजून घ्या
समाजातील लोकांचा आक्रोश, संतापाची लाट कशासाठी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही हे सरकारला कळायला हवं. उगाच डिवचायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. यांनी विधानसभेचे दार आतून बंद केलेय, ते उघडावे लागणार आहे, असा इशाराही जरांगे यांनी दिला. मराठय़ांचे कल्याण व्हावे, तसे लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे ही प्रामाणिकपणाची भावना आहे. बारा बलुतेदारांची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. सर्व जातीधर्माला आरक्षण दिले पाहिजे. वेळ पडली तर सगळ्यांनी एकत्र येत विधानसभेत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे जरांगे-पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण जनजागृती संवाद शांतता रॅलीचा मराठवाडय़ातील पहिला टप्पा पार पडल्यानंतर मनोज जरांगे- पाटील आता 7 ऑगस्टपासून शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात करणार आहेत. हा दौरा 7 ऑगस्ट रोजी सोलापुरातून सुरू होणार असून 8 ऑगस्ट सांगली, 9 ऑगस्ट कोल्हापूर, 10 ऑगस्ट सातारा, 11 ऑगस्ट पुणे, 12 ऑगस्ट नगर आणि 13 ऑगस्टला नाशिक येथे दुसऱया टप्प्याच्या रॅलीचा समारोप होणार आहे.