आरक्षण द्या; नाहीतर सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू! मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

कोणतेही षड्यंत्र सरकारने रचले तरीही ते उधळून लावणार असून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. मराठय़ांना आरक्षण द्यावे; अन्यथा सरकारला ‘सळो की पळो करून सोडू’ असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

आंतरवाली सराटी येथून शनिवारी मुंबईकडे निघालेले मराठा आंदोलकांचे वादळ आज दुपारी पाथर्डी तालुक्यातील आगासखांड येथे पोहोचले. यावेळी झालेल्या सभेत जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी मराठा समाजासह इतर समाजाचे नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जरांगे म्हणाले, ‘राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. आणखी वेळ द्यावा, असे शासन म्हणत असले तरीही यापूर्वी सात महिन्यांचा अवधी देऊनही आमची मागणी मान्य केली नाही, तसेच कुणबीची प्रमाणपत्रेसुद्धा दिली नाहीत. त्यामुळे मराठे कोणाला घाबरत नाही, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाज एकवटला आहे,’ असे जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.

तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो आहे. परत येईन की नाही, हे मला माहीत नाही. मला दगाफटका झाला तरी तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालूच ठेवा. वेळप्रसंगी हातातील कामे सोडून रस्त्यावर उतरा. आपल्या मतांच्या जीवावर यांनी राजकारण केले असून, आता आरक्षण दिले नाही तर यांना सळो की पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.

मोठय़ा संख्येने सहभागी व्हा…
मी मॅनेज होत नसल्याने सरकारची अडचण झाली आहे. आरक्षणाचा निर्णय लावूनच आता आपल्याला गुलाल उधळायचा आहे. त्यासाठी मुंबइतील आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

पाथर्डी तालुक्यात जरांगे यांचे भव्य स्वागत
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकांचे वादळ आज दुपारी पाथर्डी तालुक्यात पोहोचले. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह आंदोलकांचे भव्य स्वागत करण्यात आले. आंदोलकांनी पाथर्डी तालुका हद्दीत प्रवेश केल्यापासून ते हद्द सोडेपर्यंत जरांगे-पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तनपूरवाडी येथे महामार्गाच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल-ताशे, लेजीम पथकांसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. पाथर्डी शहरात मराठा समाजाच्या वतीने व्रेनच्या साहाय्याने भव्य पुष्पहार घालून जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी आंदेलकांवर जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला.