मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार करतानाच, मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत असल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
आंतरवाली सराटी येथून शनिवारी मुंबईकडे निघालेले मराठा आंदोलकांचे वादळ रविवारी रात्री मुक्कामासाठी नगर शहराजवळील बाराबाभळी येथे दाखल झाले. बाराबाभळीच्या मदरशात जरांगे-पाटील यांनी मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी मराठा बांधवांचे नगर शहरात आगमन झाले. आमदार संग्राम जगताप यांच्यासह नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
जरांगे पाटील म्हणाले, ओबीसी व मराठा समाज एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एकमेकांना बैल, औत आदींसह अनेक गोष्टींची मदत करतात. एकमेकांच्या लग्नात आम्ही वाढायला असतो, असे आमचे प्रेम आहे. मात्र, मंत्री भुजबळ यांच्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण झाल्याचे दिसते. असे असले तरी गावोगावी, खेडोपाडय़ात मात्र आम्हाला ओबीसींचा पाठिंबा आहे.
एकदा समोरासमोर भेटा ‘दूध का दूध पाणी का पाणी’ करू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘थोडा धीर धरा’ असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता, जरांगे म्हणाले, आता धीर किती धरायचा तेच कळेना. त्यांनी एकदा समोर येऊन बोलावे. सात महिन्यांत ते कधी भेटायलाही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी येऊन एकदा समोरासमोर भेटावे आणि ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ करावे, असे त्यांनी सांगितले.