आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे फिरणार नाही – मनोज जरांगे पाटील

आता मराठा समाज एक झाला आहे. त्यामुळे आता आरक्षण मिळायला वेळ लागणार नाही. प्रशासनाच्या सर्व यंत्रणा मराठा आंदोलनामुळे कामाला लागल्या आहेत. मी मराठा जातीला माय-बाप मानले आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे फिरणार नाही. वेळ प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेल, मरण पत्करेल. आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्या एका ओबीसी नेत्याला भजे तळायला लावेल’ एकीकडे सरकार व दुसरीकडे एक ओबीसी नेता; मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात आहे. त्या एका ओबीसी नेत्याला भजे तळायला लावेल. अशी टीका त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात समाज बांधव आहेत. भिंगार जवळील बाराबाभळी येथे ते रविवारी मध्यरात्री मुक्कामासाठी पोहोचले असता त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. सोमवारी सकाळी जरांगे पाटील पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते नगर शहरातून जाणार आहेत. नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत केल्यानंतर नगरमध्ये सुद्धा त्यांचे अशाच पद्धतीने स्वागत करण्यात आले पहाटेच्या सुमाराला इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी येत होते त्यामुळे मोठी गर्दी दिसून येत होते

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा एक व्हायला उशीर लागल्याने आरक्षण मिळायला उशीर झाला. आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आहे. मराठे ही लढाई जिंकत आले आहेत. करंजीच्या घाटात प्रशासनाने मराठा आंदोलकांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ही संख्या मोजू शकले नाहीत. आता आम्ही मराठे मुंबईकडे निघालो आहेत. सरकारने आरक्षण द्यायला हवे होते. कारण, ते आमच्या हक्काचे आहे. 54 लाख नोंदी यापूर्वी कोणाच्याही आढळलेल्या नाहीत. बीड जिल्ह्यातील एका गावात अडीचशे नोंदी सापडल्या आहेत. 54 लाख लोकांना आरक्षण मिळाले तर त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळेल. त्यामुळे कोणताही मराठा आरक्षणाविना राहणार नाही.

‘त्या एका ओबीसी नेत्याला भजे तळायला लावेल’
एकीकडे सरकार व दुसरीकडे एक ओबीसी नेता; मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात आहे. त्या एका ओबीसी नेत्याला भजे तळायला लावेल. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळालं हे त्याला कळालंही नाही. त्याला वाटलं मी मोठा आहे. हा किरकोळ देहयष्टीचा आहे. मात्र, मी काय आहे, त्यांना आता कळू लागले आहे. मी अर्धी भाकरी खाणारा असलो तरी त्यांची भाकरी बंद करेल. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही, असे त्यांना वाटले होते. मात्र, समाजाने एकोपा दाखविला. समाजाने एकत्र येत आंदोलनाला पाठबळ दिले. त्या ओबीसी नेत्याने मराठा आरक्षणाला विरोध केला तर मंडल आयोगाच्या आरक्षणाला मी आव्हान देईल. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर कोणालाही आरक्षण मिळू देणार नाही, असा सूचक इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

माणसाला बळ दिल्या शिवाय तो उभा राहू शकत नाही. मी मराठा समाजाच्या बळावर उभा आहे. मी निघाल्यावर अंतरवलीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. मी शेवटची लढाई लढायला निघालो आहे. मराठा समाज एकत्रित येऊ नये म्हणून अनेक जण देव पाण्यात ठेऊन आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आरक्षण मिळालेले व आरक्षण न मिळालेल्या सर्व मराठ्यांनी एकत्र या, व्यसनापासून दूर रहा म्हणजे मराठा समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठा आरक्षणाची लढाई जिंकत आली आहे. महाराष्ट्रातील पहिले आंदोलन आहे की, ज्याने सरकारला सात महिन्यांचा कालावधी दिला. कुणबीच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आरक्षण देणे बाकी आहे. त्यांच्या परिवारातील व सग्यासोयऱ्यांना आरक्षण द्या. गावोगावांत सापडलेल्या नोंदीची यादी संबंधित ग्रामपंचायतीत लावा व शिबिरे घेऊन झटपट जातीचे दाखले द्या. मी सरकारला मॅनेज होत नाही. पद व पैशाशी माझे जमत नाही. आरक्षणाची अशी संधी पुन्हा येणार नाही. लेकरांना आरक्षण मिळाल्या शिवाय एक पाऊलही मागे हटू नका. आम्ही मुंबईला निघालो आहोत. मागे राहिलेल्यांनी आरक्षण लढ्याची खिंड लढवा. सर्व पक्षीय आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंंदोलन करा. २५ जानेवारीला मराठा समाज मुंबईच्या सर्वत्र दिसेल. शांततेत आंदोलन करण्यात मोठी ताकद आहे. त्या ताकदीने सर्वांनी मुंबईला चला. उरलेल्यांनी गावाकडे मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी मराठा समाजाला दिल्या.