संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवून गुंड मित्र वाचवला, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याने धनंजय मुंडे यांना सहआरोपी केले नाही. यात मुंडे यांना शिक्षा झाली असती. मात्र राजकीय मित्राला वाचवले. आता खून, खंडणी, जमिनी बळकवण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला माफी नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर चार्जशीट दाखल झाल्याने पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी होतीलच, अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडे यांना क्लीन चिट असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे यांनी दिले. चार्जशीटमध्ये फोडाफोडी होणार नाही, यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मागितली. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसऱया दिवशीच चार्जशीट दाखल केल्याने धनंजय मुंडे सहआरोपी होणार होते. मात्र मुंडे या प्रकरणात वाचले, असे जरांगे म्हणाले.

छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकीय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्षाच्या प्रामाणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणाने त्यांच्या राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र पुढील तपासात काही सहआरोपी होतील. तसे न झाल्यास पुढील काळात त्रास देणाऱया टोळीविरुद्ध आमची मोहीम असेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.