दलित-मुस्लिम -मराठा एकत्र आल्याशिवाय राज्यात निवडणूक जिंकू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठय़ांना आरक्षण न देऊन समाजाला फसवले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने एकत्र येऊन त्यांचा सुपडा साफ करावा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे केले.
ते म्हणाले की, मराठा, दलित, मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला फक्त दोन दिवस द्या, समाजहिताचे, समाजकारणाचे समीकरण जुळवणार असल्याचे ते म्हणाले. मराठा समाज एकत्र झाल्याने सगळय़ाच पक्षांतील लोक येत आहेत. रात्री दोन वाजले की, भाजपचेसुद्धा भेटायला येतात. दिवसासुद्धा येतात. भाजपमधले तिकीट हुकलेले तर जाहीर आहेत. आम्ही ताकदीने बलाढय़ असूनही आम्हाला गिनतीत घेतले नव्हते. आता मराठय़ांच्या चपलांसकट पाया पडत आहेत.
हरयाणा पॅटर्नवरून जरांगे पाटील म्हणाले, फडणवीसांचे रक्त कोणते ते कळत नाही. सकाळी हिंदू, दुपारी ओबीसी, तिसऱया प्रहरी पुरोगामी, डीएनए म्हणतात. राज्यात भाजप संपला तर फक्त फडणवीसांमुळे संपेल, असेही जरांगे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर 16-17, जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी सागर बंगल्यावर बसून नसते होत, ज्यांना महामंडळे दिली त्यांना दोन दोन वर्षे निधीच दिला नाही. देवेंद्र फडणवीस हा माणूस मस्तीत जगणारा आहे असे जरांगे म्हणाले.