दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आल्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही

दलित-मुस्लिम -मराठा एकत्र आल्याशिवाय राज्यात निवडणूक जिंकू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण न देऊन समाजाला फसवले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने एकत्र येऊन त्यांचा सुपडा साफ करावा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, मराठा, दलित, मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला फक्त दोन दिवस द्या, समाजहिताचे, समाजकरणाचे समीकरण जुळवणार असल्याचे ते म्हणाले. मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्षांतील लोक येत आहेत. रात्री दोन वाजले की, भाजपचेसुद्धा भेटायला येतात. दिवसासुद्धा येतात. भाजपमधले तिकीट हुकलेले तर जाहीर आहेत. आता फडणवीसांनी फसवल्यामुळे मराठा समाज चिडलेला आहे. आम्ही ताकदीने बलाढ्य असूनही आम्हाला गिनतीत घेतले नव्हते, आता मराठ्यांच्या चपलांसकट पाया पडत आहेत.

हरियाणा पॅटर्नवरून मराठा आंदोलक जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस टिका करताना म्हणाले. महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ करणार असून, फडणवीसांचे रक्त कोणते ते कळत नाही. सकाळी हिंदू, दुपारी ओबीसी, तिसर्‍या प्रहरी पुरोगामी, डिएनए म्हणतात. राज्यात भाजप संपला तर फक्त फडणवीसमुळे संपेल, असेही जरांगे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर १६-१७, जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी सागर बंगल्यावर बसून नसते होत, ज्यांना महामंडळे दिली त्यांना दोन दोन वर्षे निधीच दिला नाही. देवेंद्र फडणवीस हा माणूस मस्तीत जगणारा आहे. मराठ्यांना खुन्नस दिली. त्यामुळे मराठा हिशेब करणार असल्याचे जरांगे म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करताना ते म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून धनगरांना आरक्षण देईल असे ते म्हणाले होते. एसबीसीचे आरक्षण देवुन इडब्ल्युएसचे आरक्षण मराठ्यांच्या आरक्षणात घातले. दीड लाख मुलांवर व समाजावर गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला.