मराठा बांधवांना आरक्षण शंभर टक्के मिळणार असून, जिव्हारी लागेल असे काम करू नका. बीड, जालना, सिल्लोड येथे काहींनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करू नका. मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी घायचे आहेत? असा सवाल उपस्थित करून, हे थांबले नाही तर भयंकर मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना दिला.
उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांची पोरं तुमच्यामुळे आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री, तुम्ही आरक्षण देत नसाल तर आम्हाला वेगळे आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावे लागेल. मुख्यमंत्री, तातडीने आरक्षण द्या; अन्यथा आमचा संयम सुटेल. तुम्ही मजा पाहणार असाल तर त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागेल !
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना यंत्रणा सोडणार नाही. धनंजय मुंडे यांची टोळी आरोपींना लपवत आहे. या टोळीमुळे एका नेत्याने जिवंतपणी मरणयातना भोगल्या. धनंजय मुंडे भेटण्यास आल्यावर मला सांभाळा, असे म्हणाले होते. तो रात्री आला, मी भेटायचे नाही म्हणालो. पण बाहेर थांबले म्हणून भेटलो. कराडला पाहिल्यावर हाच हार्वेस्टर पैसे खाणारा आहे का? असे म्हणालो होतो, असे जरांगे म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या टीकेचा समाचार घेताना जरांगे म्हणाले, तुम्हाला ठेवायचं का वरबडायाला, दम निघत नाही का? ठेका घेतला का बोलायचा? आम्ही कशामुळे बोलायचं नाही? असे ते म्हणाले.
शास्त्रींचे पितळ उघडं पडत आहे
भगवान गडाचे मठाधिपती नामदेव महाराज शास्त्री यांच्यावरही त्यांनी टीका केली. जे बोलायचं ते शास्त्री बोलून गेले. त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडत आहे. जातीयवाद किती असतो टोळीने दाखवले. असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकून आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्राचं नुकसान करणारे आहेत. पोटातील ओठावर आल्याने बाबाला दोष देत नाही. करून बोलून घेणारी टोळी आहे, स्वतःसाठी देवधर्म कळेना. काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाल्यावर ते लोक व्यक्त होत असल्याचे जरांगे म्हणाले.