![manoj jarange](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/manoj-jarange-696x447.jpg)
वाल्मीक कराडची बातमी पाहिली म्हणून डोक्यात कोयता घातला. धनंजय मुंडेंच्या टोळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना लागलेला कलंक आहे, असा कडक हल्लाबोल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात, कोणालाही सोडणार नाही, पण त्यांनी धरलेय कोणाला, असा प्रश्नही जरांगे यांनी केला.
अशोक मोहिते हल्ला प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी बीडमधील गुंडगिरीवर कडाडून हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांनी पोसलेल्या या टोळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना लागलेला कलंक आहे असे ते म्हणाले. या टोळ्या खंडणीखोरी करून जगत होत्या. पण आता त्याला लगाम बसला आहे. हल्लेखोरांच्या पाठीशी कोण आहे याचा शोध लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. वाल्मीक कराड शिंकला तरी त्याची अतिदक्षता विभागात शाही बडदास्त ठेवण्यात आली. हाच न्याय महादेव गितेंना का लावण्यात आला नाही. त्याला का रुग्णालयात भरती करून घेण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी केला.
विष्णू चाटेचा मोबाईल मुंडेंकडे असावा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला विष्णू चाटेचा मोबाईल धनंजय मुंडेंकडेच असावा, असा संशय मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडेंनीच खंडणी मागायला लावली असावी. खंडणीत अडथळा आणला म्हणून संतोष देशमुख यांना संपवण्यात आले असेही ते म्हणाले. वाल्मीक कराडकडे असलेली संपत्ती कुणाची आहे हे जनतेला कळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.