25 जानेवारीपासून मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण

मराठा आरक्षणासाठी दीड वर्षापासून लढा सुरू आहे. नव्या सरकारकडे मराठा आरक्षणासह आमच्या इतर मागण्या मान्य करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. सरकारने बेइमानी केल्यास 25 जानेवारीपासून आंतरवालीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे यांनी आज आंतरवालीत पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयऱयांचा अध्यादेश गेल्या वर्षी 25 जानेवारी रोजी काढला होता. त्याला आता वर्ष होत आहे. मात्र अजूनही या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही. मराठा आरक्षणासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडे 25 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. मागण्या मान्य झाल्या तर ठीक नाहीतर आंतरवालीत ‘न भूतो न भविष्यती’ असे उपोषण होईल, असे त्यांनी सांगितले.

उपोषण आंतरवालीतच होणार

सरकारने चालबाजी केल्यास 25 जानेवारीपासून होणारे उपोषण आंतरवालीतच होईल, इतर कुठेही नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील मराठय़ांनी लेकराबाळांसह आंतरवालीत यावे. ज्यांना उपोषण सहन होत असेल त्यांनी उपोषण करावे, इतरांनी उपोषणाला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपोषणाला येताना अंथरुण, पांघरुण, खाण्यापिण्याचे साहित्य, औषध व गोळय़ा घेऊन या, असे आवाहनही त्यांनी केले.