याद राखा, आमच्या गाडय़ा रोखाल तर! मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला बजावले

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई आम्ही सुरू केली आहे. 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणाऱया मराठय़ांना घेरण्याचे मनसुबे रचले जात आहेत. याद राखा, आमच्या गाडय़ा रोखाल तर! मुंबईकडे जाणारे दूध, भाज्या, अन्नधान्य थांबवण्यात येईल, असे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला बजावले. मुंबईत आंदोलन सुरू झाल्यानंतर सरकारसोबत चर्चेची कवाडे बंद करण्यात येतील, असेही जरांगे यांनी सांगितले.

आंतरवाली सराटी येथे आज मुंबईत होणाऱया आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी सरकारच्या ढिम्म कारभारावर कडाडून हल्ला चढवला. मराठा आरक्षणासाठी सरकारने शब्द देऊनही पाळला नाही. त्यामुळे आता अधिक वेळ देणे शक्य नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी कोटय़वधी मराठे 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता आंतरवाली येथून मुंबईकडे प्रस्थान करतील, अशी माहिती जरांगे यांनी दिली.

तर मुंबईची नाकेबंदी करू

आमच्या वाटेत काटे पेरण्याचे काम चालू आहे. मराठय़ांच्या गाडय़ा रोखणे, त्यांना इंधन मिळू नये असा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारने आगीशी खेळ करू नये. आमच्या गाडय़ा रोखल्या तर आम्ही मुंबईची नाकेबंदी करू. मुंबईकडे जाणारे दूध, अन्नधान्य, भाज्या, फळफळावळ थांबवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.